लोकसभा २०१९ : ‘मावळ’साठी पुण्यातील नगरसेवकांना जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभा मतदासंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार तयारीला लागले आहेत. पार्थ पवार वियजी होण्यासाठी अजित पवार यांनीही कंबर कसली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात आज (बुधवार दि २० मार्च) सकाळीच बैठक घेतली. बारामती हाॅस्टेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत मावळ विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून विजय कोलते चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून बाबूराव चांदेरे आणि पिंपरी विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून रवींद्र माळवदकर यांची नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय या बैठकीमध्ये वडगाव शेरी परिसरातील दहा ते बारा नगरसेवकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील अन्य नगरसेवकांनाही मावळ लोकसभा मतदार संघामध्ये काम करण्यासाठी जाण्यास पवार यांनी सांगितले. या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या नातेसंबंधांची माहिती घेतली. यानुसार त्यांनी संपर्क यंत्रणा उभी करण्याचे आदेशही कार्यकर्त्यांना दिले.

पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी व्हावेत असा राष्ट्रवादीचा मानस आहे. याचसाठी राष्ट्रवादी काग्रेसकडून बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. गुरुवारी (दि २१ मार्च रोजी) निसर्ग मंगल कार्यालयामध्ये सकाळी १० वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि विविध सेलचे अध्यक्ष उपस्थित असणार आहे.