NZ : चक्क पंतप्रधानांना नाकारला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश, लॉकडाऊनच्या नियमांचा परिणाम

वेलिंग्टन : न्यूझिलंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल करुन रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यांना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे एका रेस्टॉरंटने चक्क पंतप्रधानाना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यास नकार देऊन बाहेर वेटिंग करायला लावले.

आपल्याकडे कोणी राजकीय व्यक्ती येणार असेल तर सर्व नियमांना फाटा दिला जातो. लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्री लग्न समारंभाला हजर राहतात. इथ कायदा फक्त सामान्यांसाठी असतो. अशा पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये पंतप्रधानांनाही सामान्यांप्रमाणे सर्व नियमांचे पालन करावे लागते, हे घटनेने अधोरेखित झाले आहे.

न्यूझीलंडच्या प्रंतप्रधान जेसिंडा अर्डर्न या राजधानी वेलिंग्टनमधील एका रेस्टॉरंटमध्ये आपले प्रियकर क्लार्क गेफोर्ड याच्यासमवेत गेल्या होत्या. रेटॉरंटमध्ये सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करण्यात येत असून दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर राखणे आवश्यक आहे. त्यानुसार अनेक रेस्टॉरंटमध्ये आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान जेव्हा प्रियकरासमवेत  ऑलिव्ह रेस्टॉरंटमध्ये नास्ता करण्यासाठी गेल्या. मात्र, रेस्टॉरंटमध्ये जागा नव्हती. त्यामुळे त्यांना आत सोडण्यात आले नाही. प्रंतप्रधानांनी रेस्टॉरंटजवळ सर्वाप्रमाणेच प्रतीक्षा केली, असे त्यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.