उपहारगृह चालकाकडून खंडणी उकळणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उपहारगृह चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या गुंडाच्या सिंहगड रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने वडगाव परिसरातील एका उपहारगृह चालकाकडून ३१ डिसेंबर रोजी खंडणी उकळून पसार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा शोध घेऊन गजाआड केले.

सतिश ज्ञानोबा शिंदे (वय २५, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका उपहारगृह चालक भवेश अरुणराव पिंपळकर (वय-३२ रा. आनंदनगर, पुणे) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडगाव येथे घडला होता.

दोन दिवसांपूर्वी उपहारगृह चालक आणि त्याचा कामगार सिंहगड रस्ता भागातून दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी शिंदे याने दुचाकीस्वार उपहारगृह चालकाला अडवले. उपहारगृह चालक आणि त्याच्याबरोबर असलेल्या कामगाराला शिंदेने कोयत्याचा धाक दाखविला. दरमहा ५० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी शिंदेने केली. त्यानंतर उपहारगृह चालकाच्या खिशातील ६ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. शिंदे तेथून पसार झाला. घाबरलेल्या उपहार गृह चालकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

त्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी तातडीने तपास करुन आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. पसार झालेला शिंदे सिंहगड रस्ता भागात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, दयानंद तेलंगे-पाटील, श्रीकांत दगडे, दत्तात्रय सोनवणे, सचिन माळवे, मयूर शिंदे आदींनी सापळा लावून शिंदेला पकडले. आरोपी शिंदे सिंहगड रस्ता भागातील बंटी पवार टोळीतील आहे. बंटी पवार आणि त्याच्या साथीदारांनी या भागातील व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळल्याच्या घटना घडल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी पवार आणि त्याच्या साथीदारां विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यााअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. पवार आणि साथीदार सध्या कारागृहात आहेत.