‘या’ अटींवर सुरू होणार रेस्टॉरंट, CM उद्धव ठाकरेंनी सांगितलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनानं रेस्टॉरंट सुरू करण्याच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वं तयार करून ती संबंधितांना पाठवलेली आहेत. ती फायनल झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या प्रतिनिधींसोबत आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे संकट खूप मोठ्या प्रमाणात आहे व या संकटकाळात महाराष्ट्रातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिकांनी नियमांचे पालन केले आहे. व हे व्यावसायिक शासनाबरोर आहेत याचा मला आनंद आहे.”

पुढे बोलताना सीएम ठाकरे म्हणाले, “आजही कोरोनावर कुठल्याही प्रकारची लस निघालेली नाही. परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला खूप काळजीपूर्वक जगावे लागणार आहे. आत्तापर्यंत अनेक व्यवसाय बंद होते आता आपण हळूहळू सुरू करत आहोत. व्यवसाय बंद ठेवणे ही निश्चितच चांगली बाब नाही किंवा आवडीचा विषय नाही. व्यवसायातून सरकारला कर स्वरूपात मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आणि हे व्यवसाय जर बंद असतील तर राज्यशासनाचा येणारा महसूल देखील थांबतो. अशा गोष्टीची सरकारला जाणीव आहे. म्हणून सर्व जबाबदारीचे भान ठेवून व मर्यादा पाळून व्यवसाय चालू करण्याचा आपला प्रयत्न आहे.” असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे असंही म्हणाले की, “कोरोनासोबत जगताना सर्वांनाच जीवनशैलीत बदल करावे लागणार आहेत. यात वेळोवेळी हात धुणे, तोंडाला मास्क असणे, शारीरिक अंतर पाळणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रेस्टॉरंट सुरू करतानाही याचा विचार केला जाणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं या गोष्टी अत्यावश्यक ठरणार आहेत. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे आणि इतर कर्मचारी यांची आरोग्यविषयक काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी मास्क लावणं, सतत हात धुणं गरजेचं आहे” असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.