पुण्यात मतदानाची शाई दाखवा अन् मिळवा बंपर ऑफर्स

कुठे आणि कोणत्या आहेत ऑफर्स ? जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यापैकीच एक बारामती मतदार संघ आहे. आज पुण्यात देखील मतदान होत आहे. शहरात सकाळपासूनच मतदानाकरिता पुणेकर प्रतिसाद देत आहेत. पण काही तरी हटके करण्याकडे पुणेकरांचा नेहमीच कल असतो. मतदान जनजागृती करिता शहरातील काही हॉटेल्स, मेस आणि दुकाने यांनी बिलांवर सूट दिली आहे. या ऑफर्स मतदान करून येणाऱ्या व्यक्तीला दिल्या जात आहेत. यातून एकीकडे राष्ट्रकार्यात सहभाग आणि दुसरीकडे व्यवसायवृद्धी असे हेतू साध्य करण्याची डोक्यालिटी पुण्यात लढवली जात आहे.

शहरात सर्वात जास्त चर्चा आहे ती मयूर कॉलनी येथील ‘कडक’ मिसळीची. मतदान करून आलेल्यांना येथे चक्क एका मिसळीवर दुसरी मिसळा मोफत दिली जाणार आहे. हातावरच्या बोटावरची शाई दाखवून नागरिकांना ही सवलत घेता येणार आहे.

याबरोबरच पुण्यातील घरघुती उत्पादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘अग्रज फूड्स’ यांनी देखील आज मतदान करणाऱ्यांकरिता विशेष सवलत देऊ केली आहे. त्यांच्या उत्पादनांवर १० टक्के सवलत दिली जाणार आहे. ‘अग्रज’ यांच्या टिळक रस्ता आणि कर्वेनगर परिसरातील दुकानांमध्ये १० टक्के सवलत दिली जाणार आहे. याठिकाणी देखील मतदान केल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक असणार आहे.

याबरोबरच कॅम्प परिसरातील ‘द ग्रीन लिफ’ हॉटेलने त्यांच्या बिलावर १५ टक्के सवलत देऊ केली आहे. तसेच ‘स्पाइस मंत्रा’ या हॉटेलमध्ये २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच बिबवेवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये पोहे, उपमा अशा नाश्त्याच्या पदार्थांवर सवलत देण्यात येणार आहे.