‘बिंदास बोल’ वादग्रस्त कार्यक्रमाच्या प्रसारणावर निर्बंध

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुस्लीम समाजाची बदनामी होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे ‘सुदर्शन टीव्ही’वरील ‘बिंदास बोल’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या उर्वरित भागांच्या प्रसारणास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली. कार्यक्रमाद्वारे एका समाजाला टारगेट केले जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

‘नोकरशाहीमध्ये मुस्लीम समाजाच्या घुसखोरीच्या कारस्थानचा भंडाफोड’ अशी जाहिरातबाजी करणारा ‘सुदर्शन टीव्ही’वरील हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर या कार्यक्रमाचा एक भाग 10 सप्टेंबरला प्रसारित करण्यात आला होता. या प्रकरणावर न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. आतापर्यंत प्रसारित झालेल्या या भांगातून या कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश स्पष्ट दिसतो.

त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत हा कार्यक्रम प्रसारित करून नये, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकेवर 17 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. याआधी 28 ऑगस्टला न्यायालयाने प्रसारणबंदीस नकार दिला होता. मात्र, तेव्हापासूनची या कार्यक्रमासंदर्भातील परिस्थिती बदलली आहे, असे न्यायालयाने नमूद केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या स्वयंनियमनासाठी पाच नामवंतांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती इलेक्टॉनिक माध्यमांच्या दर्जाबाबत मानके निश्चित करील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.