राज्यात जिल्हांतर्गत वाहतूक विना E-Pass सुरू करण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांचं विधान, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे माल वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. याचे परिणाम आर्थिक स्वरूपात दिसून आल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यातील वाहतूक विना निर्बंध सुरू होण्याची शक्यता असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. केंद्र सरकारने राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. वस्तू व प्रवासी राज्यातंर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केल्यासंदर्भात राज्य सरकारने दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हातंर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी अनलॉकच्या तिसर्‍या टप्प्यातील मार्गदर्शक सूचनांची माहिती नमूद केली आहे. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने 29 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार आंतरराज्यीय व राज्यांतर्गत वस्तूंची ने-आण तसेच व्यक्तींच्या प्रवासावरील निर्बंध हटवण्यात आले असून, स्वतंत्र परवानगी वा ई-पासची गरज नाही. मात्र, अनेक राज्य व जिल्हा प्रशासनांनी हे निर्बंध कायम ठेवल्याचे आढळले आहे. म्हणूनच वस्तू व व्यक्तींच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध लादू नयेत, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलेले आहे.