मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची घोषणा केली असून याबाबतची आचारसंहिता दिनांक 10 मार्च 2019 पासून अंमलात आलेली आहे. जिल्‍हयात दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी अहमदनगर व दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी शिर्डी (अ.जा) लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक खुल्‍या, निर्भय, शांततामय, न्‍याय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्‍यक असून कोणतीही अनुसूचित घटना घडू नये तसेच सार्व‍जनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये म्‍हणून मतदान केंद्राचे ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्‍या दृष्‍टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्‍या कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केला आहे.

जिल्‍हयात 37-अहमदनगर व 38- शिर्डी लोकसभा मतदार संघाच्‍या भौगोलिक हद्दीमध्‍ये पुढीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अ) मतदानाच्‍या दिवशी – 1) मतदानाच्‍या दिवशी लोकसभा मतदारसंघातील कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मतदान केंद्रामध्‍ये किंवा मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्‍या आतील कोणत्‍याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्‍ये मते मिळवण्‍यासाठी प्रचार करता येणार नाही. कोणत्‍याही मतदाराकडे मताची अभियाचना करता येणार नाही. कोणत्‍याही विशिष्‍ट उमेदवारास मत न देण्‍याबद्दल कोणत्‍याही मतदाराचे मन वळवता येणार येणार नाही. निवडणूकीशी संबंधीत अशी ( शासकीय सूचनेव्‍यतिरिक्‍त अन्‍य ) कोणत्‍याही सूचना किंवा खूण प्रदर्शित करता येणार नाही. मतदान केंद्रामध्‍ये किंवा त्‍याच्‍या प्रवेशाद्वाराजवळ किंवा आसपासच्‍या भागातील कोणत्‍याही सार्वजनिक व खाजगी जागेमध्‍ये ध्‍वनिवर्धक किंवा ध्‍वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्‍या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरता किंवा वाजवता येणार नाही. मतदान केंद्रामध्‍ये किंवा प्रवेशद्वाराजवळ किंवा त्‍याच्‍या आसपासच्‍या भागातील कोणत्‍याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्‍ये आरडाओरड करणे किंवा गैरशिस्‍तीने वागता येणार नाही. प्रतिबंधीत क्षेत्रापेक्षा अधिक अंतरावरुन ध्‍वनीक्षेपक इत्‍यादीचा वापर केला जात असेल तरीही त्‍यामुळे मतदानासाठी मतदान केंद्रात येणा-या व्‍यक्‍तीला त्रास होत असेल किंवा मतदान केंद्रामध्‍ये कामावर असलेल्‍या अधिका-यांच्‍या आणि इतर व्‍यक्‍तींच्‍या कामात अडथळा येत असेल तर तो सुध्‍दा अपराध समजण्‍यात येईल.

2) मतदान केंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्‍या परिसरात निवडणूकीसाठी कामानिमित्‍ताने शासकीय वाहन वगळता इतर कोणत्‍याही प्रकारचे वाहन आणता येणार नाही. अत्‍यावश्‍यक सेवांकरिता लागणारी वाहने- रुग्‍णवाहिक, अग्निशामक, पाण्‍याचे टॅकर, दुग्‍ध वाहतूक करणारी वाहने, विद्युत सेवेकरिता अत्‍यावश्‍यक वाहने निवडणूक कामाकरिता नेमण्‍यात आलेली पोलिस व इतर शासकीय अधिकारी यांची वाहने यांना हा आदेश लागू होणार नाही. शारिरीकदृष्‍टया विकलांग असणा-या व्‍यक्‍तीना स्‍वतःकरिता वापरलेली वाहने.

3) मतदारांना ने आण करण्‍यासाठी अनधिकृतपणे वाहनाचा वापर करता येणार नाही .

4) मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्‍या परिसरात मंडप उभारण्‍यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना बसण्‍यासाठी टेबल व खुर्च्‍या लावण्‍यास या आदेशाद्वारे मनाई करण्‍यात येत आहे.

5) मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्‍या आत निवडणूक कर्तव्‍यावर नियुक्‍त अधिकारी वगळता इतरांना सेल्‍युलर फोन , कॉर्डलेस फोन नेण्‍यास परवानगी नाही.

6) मतदार चिठ्ठीसाठी साधा पांढरा कागदा असावा. ज्‍यावर उमेदवार पक्षाची खूण, चिन्‍ह असू नये.

7) मंत्री, संसद सदस्‍य, विधानमंडळ सदस्‍य किंवा व्‍यक्‍ती ज्‍यांना सुरक्षा कवच आहे ते निवडणूक प्रति‍निधी , मतदान प्रतिनिधी असणार नाहीत.

8) सुरक्षा कवच असलेल्‍या कोणत्याही व्‍यक्‍तीला मतदान प्रतिनिधी म्‍हणून कार्य करण्‍यासाठी त्‍याच्‍या सुरक्षा कवचला समर्पित करण्‍यास परवानगी दिली जाणार नाही.

ब) मतदान समाप्‍तीसाठी निश्चित केलेल्‍या वेळेपूर्वी 48 तासात – मतदान समाप्‍तीसाठी निश्चित केलेली वेळ संपण्‍याच्‍या 48 तासाच्‍या कालावधीत निवडणूक विषयक कोणतीही बाब लोकांना चलचित्रक, दूरदर्शन संच किंवा इतर तत्‍सम उपकरणाद्वारे दाखवू शकणार नाही.

भारत निवडणूक आयोगाच्‍या मतदानापूर्वी अवलंबवयाच्‍या आदर्श कार्यपध्‍दती पुस्तिकेमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे दोन्‍ही लोकसभा मतदार संघाच्‍या मतदान समाप्‍तीची निश्चित केलेली वेळ संपण्‍याच्‍या 48 तासांच्‍या कालावधीत प्रचारासाठी कोणत्‍याही जाहीर सभा आणि मिरवणूका आयोजित करता येणार नाहीत. तसेच 5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र होणे/ एकत्र संचार करता येणार नाही. तथापी उमेदवारास घरोघरी भेटी देणे यावर या आदेशान्‍वये निर्बंध राहणार नाही जिल्‍हाधिकारी अहमदनगर यांनी एका आदेशान्‍वये कळविले आहे.