अकोले विश्लेषण : शरद पवारांच्या प्रयत्नातून पिचडांचा ‘पाचपुते’ झाला !

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल शिर्के) – राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या पिचड पिता-पुत्रांचा “बबनराव पाचपुते” करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश आले आहे. पिचडांचा पराभव करून शरद पवारांनी ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’, हे वाक्य राजकारणात खरं करून दाखविले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. पिचडांचा हा भाजपा प्रवेश सामान्य कार्यकर्ते व अकोलेकरांच्या चांगलाच जिव्हारी लागला. मात्र पिचडांनी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोलेत आणून अकोलेचा जनादेश माझ्याच बाजूने असल्याचा देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या जनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी पिचड पिता-पुत्रांवर चांगलीच स्तुतीसुमने उधळली. पिचडांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष बांधणीसाठी अकोले तालुक्यात मोठा संघर्ष करावा लागला. मात्र अजित पवारांच्या सभेनंतर अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.

कार्यकर्ते स्वतःहून पुढे येऊ लागले व त्यांनी परिवर्तनाचा विडा उचलला. त्यातच जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून डॉ.किरण लहामटे यांना पक्षाची उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी पक्षाची ही जागा अबाधित राहणार यात कोणतीही शंका उरली नव्हती. निवडणूक ऐन रंगांत आली असताना वैभव पिचड यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. तर शेवटच्या टप्प्यात डॉ.लहामटेंची प्रचारयंत्रणा ढिम्म झाली होती. मात्र जनतेने ही निवडणूक स्वतः हातात घेतली असल्यामुळे मतदारांनी स्वयंस्फूर्तीने डॉ.किरण लहामटेंना विक्रमी मतदान केले.

मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरी पासून डॉ.किरण लहामटे आघाडीवर राहिले तर वैभव पिचड हे सातत्याने पिछाडीवर राहिले. डॉ.लहामटे यांना उच्चांकी 1 लाख 13 हजार 414 मते पडली तर वैभव पिचड यांना अवघी 55 हजार 725 मते मिळाली. डॉ.लहामटे हे ऐतिहासिक 57 हजार मतांनी निवडून आले. डॉ.किरण लहामटेंना जेवढे मताधिक्य मिळाले तितकी मते देखील वैभव पिचडांना मिळाली नाही. पिचडांचा हा पराभव ऐतिहासिक दारुण पराभव ठरला आहे.

माजी मंत्री पिचड राजकारणात असताना त्यांना 1 लाखाच्या पुढे कधीही मताधिक्य मिळाले नव्हते. हे सर्व रेकॉर्ड डॉ.किरण लहामटे यांनी मोडीत काढले आहे. विशेष म्हणजे पिचडांचे अकोले तालुक्यात राजकारण करणाऱ्या सीताराम पाटील गायकर, मिनानाथ पांडे, कैलासराव वाकचौरे, रमेशकाका देशमुख, शिवाजीराजे धुमाळ, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, काशीनाथ साबळे, अरुण शेळके आदींच्या बालेकिल्ल्यातूनच किरण लहामटे यांना मतांची लयलूट झाली आहे. त्यामुळे पिचडांना हा मोठा धक्का मानला जातोय. अकोले तालुक्यातील सर्वच संस्था पिचडांच्या ताब्यात आहे. मात्र तालुक्यात सत्ता परिवर्तन झाल्याने या संस्थांचे भविष्य देखील अधांतरी आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ.किरण लहामटे यांना मोठी ताकद दिल्याने एक फाटका कार्यकर्ता कमी द्रव्याच्या जोरावर आमदार म्हणून निवडून आला आहे. माजी मंत्री पिचडांना मानणारा अकोले तालुक्यात मोठा वर्ग आहे. मात्र माजी आमदार वैभव पिचड यांच्या भोवती गराडा घालणाऱ्या बगलबच्चयांनीच पिचडांचा घात केला आहे. वैभव पिचड यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास कार्यकर्त्यांवर कधी ही न रागावणार दिलदार माणूस म्हणजे वैभव पिचड. मात्र माणसं पारखण्यात अपयशी ठरलेल्या या आमदाराचा लाभार्थी बगल बच्चयांनीच घात केला आहे, यात काहीच शंका नाही.

डॉ.किरण लहामटेंच्या रूपाने अकोलेकरांना एक उच्चशिक्षित धेयवेडा आमदार लाभला आहे. आपल्या आमदारकीच्या काळात ते अकोले तालुका सुजलाम सुफलाम करतील, अशी अपेक्षा अकोलेकरांना आहे. अन्यथा अकोलेची जनता पुन्हा परिवर्तन करेल, यात तिळमात्र ही शंका नाही.

Visit : Policenama.com