×
Homeराजकीयपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ ! चंद्रकांत पाटील यांची...

पुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ ! चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणेकरांसह करवीरनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरातील पदवीधर आता पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील उमेदवाराचे भविष्य ठरविणार आहेत. सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असले तरीही मतदानाच्या टक्केवारीमध्ये मात्र, कोल्हापूरने बाजी मारलीय. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

पदवीधर मतदारसंघासाठी झालेली ही अनेक अर्थाने वैशिष्टपूर्ण ठरलीय. या मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी केलीय. एरवी या निवडणुकीबाबत मतदारांना फारसे औत्सुक्य नसे. मात्र, यंदा ही निवडणूक त्यालाही अपवाद ठरलीय. राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे मतदानाचा टक्का वाढलाय. वाढलेला हा टक्का आणि रिंगणातील उमेदवारांची संख्या पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालीय.

पाचही जिल्ह्यांपैकी पुण्यात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 36 हजार मतदारांची नोंदणी झालीय. त्यानंतर कोल्हापूरमध्ये 89 हजार 503 मतदारांची नोंदणी झाली होती. त्यामुळे पदवीधरचा आमदार पुणेकर ठरविणार असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानानंतर सर्वच चित्र बदललंय.

पुण्यात एकूण मतदार संख्येच्या 44. 95 टक्के म्हणजे 61 हजार 404 मतदारांनी मतदान झालंय. तर, कोल्हापुरामध्ये 68. 09 टक्के म्हणजे 60 हजार 962 मतदारांनी मतदान केले आहे. सांगलीत 56 हजार 743 (65 टक्के), सातारामध्ये 34 हजार 421 (58.27 टक्के), तर सोलापुरामध्ये 33 हजार 520 (62,29 टक्के) मतदान झालंय.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात आहे. परंतु गेली दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुहीचा फायदा भाजपला झालाय. यंदा मात्र चित्र काहीसे वेगळे राहिले आहे.

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात ही निवडणूक रंगलीय. यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. तत्कालीन युतीच्या सरकारच्या 5 वर्षांच्या काळात ते मंत्रीही होते. या काळात त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वतोपरी पर्यंत पुणे विभागामध्ये केले. त्यामुळे मतदारसंघाची चांगली जाण त्यांना आहे.

सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून याच मतदारसंघातील पुणे शहरातील कोथरूडचे ते आमदारही आहेत. त्यामुळे मतदारांची नोंदणी करण्यापासून ते मतदान करून घेण्यापर्यंत त्यांनी कटाक्षाने लक्ष घेतले होते. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात भाजपचे पारडे जड असल्याचे दिसत होते. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनीही निवडणूूक तेवढीच प्रतिष्ठेची केलीय.

मागील 5 वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला त्रास पाहून त्यांची परतफेड करण्याची ही संधी आल्याचे सांगत कोल्हापूर, सांगली, सातारा भागात मतदानाचा टक्का कसा वाढेल?, यावर जाणीवपूर्वक भर दिलाय. त्यामुळे यंदा प्रथमच पदवीधर मतदारसंघातील मतदानाने विक्रम नोंदविलाय. त्यामुळे पुण्यातील पदवीधरांनी भाजपला हात दिलाय, तरी कोल्हापूर, सांगली आणि काही प्रमाणात सातारातील पदवीधरांच्या मदतीने ती उणीव भरून काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून समोर आलंय. त्यामुळे ही निवडणूक वरकरणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी दिसत असली, तर ती खरी चंद्रकांत पाटील विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातील नेते अशी राहिली आहे. यात कोण बाजी मारणार? हे लवकरच समजेल.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News