नागपूरमध्ये ‘वेगळा’ अन् पुण्यात ‘आश्‍चर्यकारक’ निकाल लागणार : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांचा नागपूर मतदार संघ सोडून जोऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे, तिथे ‘वेगळा’ निकाल लागला तर आश्‍चर्य वाटू देवु नका. तसेच वातावरण पुणे मतदार संघात असून गेल्या चार दिवसात पुण्यातील मतदारांचा प्रतिसाद बघता पुण्यातही ‘आश्‍चर्यकारक’ निकाल लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशींच्या प्रचारार्थ कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचा मेळावा कॅम्प एज्युकेशन सोसायटी येथे घेण्यात आला होता. त्यावेळी चव्हाण हे बोलत होते. तु पढे म्हणाले, मोदी विकास करण्यात अपयशी ठरले असून त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी पायाभूत सुविधांची कामे केली मात्र शिक्षण, आरोग्याबाबत काहीच काम केले नाही. शेतकर्‍यांच्या मालाला किंमती न देता ग्राहकांना कमी दरात शेतीमाल मिळण्यासाठी चुकीचे आयात-निर्यात धोरण त्यांनी राबवले. नोटबंदी, जीएसटी सारखे अविचारी निर्णय घेतले. मोदींची प्रवृत्‍ती ही हुकूमशाही प्रवृत्‍ती आहे. मोदींना प्रश्‍न विचारले की प्रश्‍न विचारणारा देशद्रोही ठरतो. त्यामुळे मोदी प्रत्येक बाबतीत या देशाच्या भवितव्यासाठी घातक असल्याचे चव्हाण म्हणाले. सध्या नागपूरमध्ये वेगळीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांचा मतदार संघ सोडून कोठेही प्रचाराला जावु शकत नाहीत. गेल्या चार दिवसांमध्ये पुण्यात मतदारांचा महाआघाडीच्या उमेदवाराला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये ‘वेगळा’ अन् पुण्यात ‘आश्‍चर्यकारक’ निकाल लागणार असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.

यावेळी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, मनपातील गटनेते अरविंद शिंदे आणि इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.