किरकोळ कारणावरुन मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – भोसरी येथे माई वडेवाले दुकानाच्या समोर रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

शंकरेश्वर साकोरे असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष मारुती साकोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हृषीकेश कदम (वय 24, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शंकरेश्वर हे फिर्यादी संतोष यांचे भाऊ आहेत. शंकरेश्वर आणि आरोपी हृषीकेश यांच्यामध्ये रिक्षा चालविण्यावरून वाद झाला. त्यातून आरोपीने शंकरेश्वर यांच्या उजव्या गालावर, कानामागे व कल्ल्याजवळ दगडाने मारले. यामध्ये शंकरेश्वर यांचे दोन दात पडले. तसेच डाव्या पायावर मारून पायाला देखील गंभीर इजा केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.