केंद्र सरकार चिंतेत ! किरकोळ महागाई 6 वर्षांच्या उच्चांकावर

दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही आठवड्यात जी आकडेवारीसमोर आली त्यानुसार अर्थव्यवस्था सावरल्याचे दिसत होते. पण बुधवारी जाहीर झालेल्या महागाई आणि औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवरून केंद्र सरकारच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. जानेवारी मध्ये खाद्यपदार्थ महागल्याने किरकोळ महागाई वाढून ७. ५९ टक्क्यांवर गेली आहे.

मागील सहा वर्षातील हा किरकोळ महागाईचा उच्चांक असल्याचे दिसून आले आहे. महागाई मध्ये सलग आठव्या महिन्यात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हाच दर १.९७ टक्क्यांवर होता. सरकारी आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित (सीपीआय) चलनवाढीचा दर डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५ टक्क्यांवर होता. रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२० मध्ये हा दर निर्धारित केलेल्या चार टक्क्यांच्या दरापेक्षा जास्त वर गेलेला आढळून आला.

डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या वृद्धिदरात ०.३ टक्के घसरण झाल्याचे आढळून आले आहे. डिसेंबरमध्ये उद्योगांचाही वेग मंदावला आहे. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत औद्योगिक वृद्धिदरात २.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. विजेचे उत्पादन घटून ०.१ टक्क्यांवर पोहोचले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये विजेचे उत्पादन ४.५ टक्क्यांनी वाढले होते. चालू वर्षात एप्रिल ते डिसेंबर या काळात ४. ५ टक्क्यांनी वाढले होते. खाणकाम क्षेत्रातील उत्पादनात ५.४ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील काही आर्थिक वर्षातील याच कालावधीत आयआयपीची वाढ ५. ७ टक्के नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे नमूद करताना सात संकेतांचा हवाला दिला आहे.