निवृत्‍त पोलिस उपाधिक्षकाकडील साडे चार कोटी लुटले

कराड ः पोलीसनामा ऑनलाईन

दोन इनोव्हा गाडयातून पाठलाग करून दरोडेखोरांनी एका निवृत्‍त पोलिस उपाधिक्षकाकडील तब्बल साडे चार कोटी रूपये लुटल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्हयातील कराड येथे घडली. त्यामुळे सातारा जिल्हयासह राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी निवृत्त डीवायएसपींना चिपळूणमध्ये सोडलं आहे. निवृत्त डीवायएसपी सध्या चिपळूण पोलिस ठाण्यात असून त्यांचे अपहरण करुन, लुटमार केली आणि त्यांना रत्नागिरीत घेऊन गेले होते.दरम्यान सातारा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून लुटीची रक्कम हस्तगत केली आहे.

कराड येथे महिंद्रा हॉटेल आहे. निवृत्‍त पोलिस उपाधिक्षक हे महाराष्ट्रातील नसुन ते कर्नाटक राज्यातील आहेत. ते सध्या व्यवसाय करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांनी यापुर्वी विजापूर येथे नोकरी केली आहे. ते आणि त्यांचे सहकारी स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. त्यांच्याकडे साडेचार कोटी रूपये होते. कराड येथे महिंद्रा हॉटेल जवळ गेल्यावर त्यांना दोन इनोव्हा कार पाठलाग करीत असल्याचे जाणवले. इनोव्हा कारमधील दरोडेखोरांनी त्यांच्या स्कॉर्पिओ इनोव्हा आडवी घातली आणि स्कॉर्पिओमधील सर्वार्ंना खाली उतरवले. दरोडेखोरांनी स्कॉर्पिओमधील साडेचार कोटी रूपये लुटले. गाडीमधील दोघांना बाहेर काढले. दरोडेखोरांनी निवृत्‍त पोलिस उपाधिक्षकांसह साडेचार कोटी रूपये स्वतःजवळ घेतले आणि ते पसार झाले. या धक्‍कादायक घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांची भंबेरी उडाली. सातारा पोलिसांनी जिल्हयात सर्वत्र नाकाबंदी केली. एवढेच नव्हे तर सातारा पोलिसांनी सांगली, रत्नागिरी, चिपळून आणि इतर ठिकाणी नाकाबंदी करावी म्हणून कळविले आहे.

निवृत्‍त पोलिस उपाधिक्षकांचे पुर्ण नाव अद्याप समजू शकलेले नाही. सातारा पोलिस दरोडेखोरांच्या त्या दोन इनोव्हा कारचा आणि दरोडेखोरांचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत. याप्रकरणाची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान सातारा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून लुटीची रक्कम हस्तगत केली आहे.