‘निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्वरित मिळावा’; भारतीय मजदूर संघाची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बीएसएनएल (BSNL) मधील सर्व निवृत्त कर्मचारी शेवटच्या तिमाहीत जाहीर होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची वाट पाहात होते. परंतु १९ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार केंद्र सरकारने आॕक्टोबर २०२० पासून महागाई भत्ता गोठवला आहे. हा अध्यादेश बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) मधील निवृत्त कर्मचाऱ्यांना लागू करण्याची आवश्यकता नाही, कारण हे कर्मचारी त्यांचे निवृत्तिवेतन सरकारी तिजोरीतून घेत आहेत असं सांगण्यात आलं आहे. परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वाढीव महागाई भत्ता गरजेचा असतो. या आदेशामुळे सार्वजनिक उद्योगात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. या अन्याय्य आदेशाचा दूरसंचार खात्यातील BTEU (BSNL) आणि BDPS या भा.म. संघ प्रणित संघटना निषेध करीत आहेत .

संघटनेच्या आदेशानुसार दि. 24 नोव्हेंबर 2020 रोजी या संघटनांच्या शिष्टमंडळाने कोरोनाचे सर्व नियम पाळून पुणे दूरसंचार कार्यालयात प्रधान महाप्रबंधक संदीप सावरकर यांची भेट घेतली. हरि सोवनी महामंत्री भारतीय दूरसंचार पेन्शनर्स संघ यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने आपले निवेदन प्रधान महाप्रबंधकांना दिले. या शिष्टमंडळात उदय गाडेकर, किरण राजहंस, जयवंत पुरंदरे, शोभा हर्डीकर, वंदना कामठे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या विषयावर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बीएसएनएल (BSNL) मधील निवृत्त कर्मचा-यांना रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल, असा इशारा (BDPS) संलग्न भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी हरी सोवनी यांनी दिला आहे.