Sangli News : निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; ‘या’ कारणामुळं सुसाईडचं पाऊल उचलल्याची चर्चा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – एका निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलही हादरले आहे.

अन्नासाहेब गुरसिद गव्हाणे (वय 65) असे आत्महत्या केलेल्या निवृत्त पोलिस हवालदाराचे नाव आहे. तर मालन अन्नासाहेब गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासाहेब गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. तिघांनी आत्महत्या करण्याइतक टोकाचे पाऊल का उचलल? याचा पोलीस शोध घेत आहे. यासाठी गव्हाणे यांच्या पोलीस मित्रांची, कुटुंबीयांची आणि शेजाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा महेश गव्हाणे याला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्यामुळे कर्जबाजारीतून कुटुंबाने आत्महत्या केली असल्याची गावात चर्चा आहे. मात्र, याचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचाही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.