बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोट्यवधीची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकासह मुलावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनने केलेल्या चौकशीत त्यांनी अपसंपदा बाळगल्याचे समोर आले.

यशवंत दादासाहेब ओंबासे (मुळ रा. निरगुडे ता.इंदापूर जि. पुणे) व मुलगा तुषार ओंबासे अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक कांचन जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक ओंबासे हे चंद्रपुरच्या बल्लारशा पोलीस ठाण्यात नेमणूकीत असताना त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याची तक्रार अ‍ॅन्टी करप्शनकडे करण्यात आली होती. त्याची चौकशी पोलीस उपअधिक्षक कांचन जाधव यांनी केली. तेव्हा त्यांच्या १ सप्टेबर १९७८ ते ३१ मे २०१३ या कालावधीत त्यांच्या कुटुंबाचे ज्ञात स्त्रोतापासूनचे उत्पन्न ३ कोटी २० लाख १ हजार ६८५ रुपये असल्याचे निष्पन्न  झाले. परंतु त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता ही ३ कोटी २६ लाख ६३ हजार ६४७ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. तर त्यांच्या कुटुंबाचा एकूण खर्च ५ कोटी ७४ लाख ४३ हजार रुपये सिद्ध झाला.

त्यात त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर तब्बल १ कोटी ८७ लाख ४२ हजार ६७६ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यांची ही मालमत्ता मिळविण्यासाठी त्यांचा मुलगा तुषार ओंबासे याने मदत केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक संदिप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक कांचन जाधव यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार यशवंत ओंबासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच बारामती येथील त्यांच्या मालमत्तेचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे.

कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितली असल्यास त्यासंदर्भात लाच लुचपतच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

Loading...
You might also like