वडिलांच्या अंत्यसंस्कारात सेवानिवृत्‍त पोलिस निरीक्षकाकडून गोळीबार ; छातीत गोळी लागल्याने वृध्दाचा जागेवर मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आजोबाच्या अंत्यसंस्कारावेळी श्रध्दांजली देण्याच्या उद्देशाने नातवाने हवेत गोळीबार करत दोन फैरी झाडल्या खर्‍या मात्र तिसरी गोळी झाडताना पिस्तूल लॉक झाले. लॉक झालेले पिस्तूल वडिलांकडे दिल्यानंतर लॉक काढताना गोळी सुटली आणि ती गोळी एका वृध्दाच्या छातीत घुसल्याने वृध्दाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी जळगाव जिल्हयातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

तुकाराम वना बडगुजर (63, रा. पिंपळगाव हरेश्‍वर, ता. पाचोरा) असे गोळीबारात मृत्युमूखी पडलेल्या वृध्दाचे नाव आहे. सेवानिवृत्‍त पोलिस निरीक्षक विठ्ठल श्रावण मोडक यांचे वडिल श्रावण बारकु मोडक (85) यांचे निधन झाले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्यावर पिंप्री (ता. धरणगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते.

त्यावेळी अग्‍नी दिल्यानंतर श्रावण मोडक यांचा नातु दिपेश (28) याने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी स्वतःजवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. दोन फैरी झाडल्यानंतर त्याचे पिस्तुल अचानकपणे लॉक झाले. लॉक काढण्यासाठी त्याने पिस्तूल वडिल विठ्ठल मोडक (सेवानिवृत्‍त पोलिस निरीक्षक) यांच्याकडे दिले.

लॉक काढताना तिसरी गोळी सुटली आणि ती थेट शेजारी उभ्या असलेल्या तुकाराम बडगुजर यांच्या छातीत घुसली. त्यामध्ये गंभीर जखमी होवुन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर उपस्थितांची भंबेरी उडाली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. गोळीबारात मृत्युमूखी पडलेले तुकाराम बडगुजर हे पोलिस कर्मचार्‍याचे वडिल होते.