लाखापेक्षा देखील जास्त कोरोनामुक्तांची नोंदच नसल्याचं उघड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राज्यात गुरुवारी १६,४७६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १६,१०४ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं. आजपर्यंत एकूण ११ लाख ४ हजार ४२६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. सध्या राज्यात २ लाख ५९ हजार ६ सक्रिय (उपचार सुरु असलेले) आहे. तथापि, राज्यात ७८.८४ टक्के रुग्ण बरे झाल्याची अधिकृत माहिती असली तरी, प्रत्यक्षात एक लाख आठ हजार कोरोनमुक्त रुग्णांची नोंदच भारतीय वैद्यक संशोधन केंद्राच्या (आयसीएमआर) संकेतस्थळावर करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.

याबाबत आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकायाने सांगितल्यानुसार, राज्यातील वेगवगेळ्या रुग्णालयांनी एका लाखांहून अधिक रुग्णांची ‘कोविड-१९ पोर्टल’वर नोंद केली नाही. त्यासाठी ९ ते १९ सप्टेंबर दरम्यान दाखल झालेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने मागवली आहे. या काळात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेतली गेली. सामान्यरित्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला रुग्ण दहाव्या दिवशी बरा होतो. तर काही जेष्ठ मंडळींना १४ दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असले तरी बहुतांश रुग्ण दहाव्या दिवशीच बरे होऊन घरी जातात.

दरम्यान, ‘कोविड-१९ पोर्टल’वर ९ ते १९ सप्टेंबर या काळात दाखल झालेलं रुग्ण, उपचारानंतर बरे झालेलं रुग्ण यांच्या आकडेवारीत तफावत आरोग्य विभागाला दिसून आली. ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने उपचारात मग्न असलेल्या रुग्णालयांनी बरे झालेल्या रुग्णांची माहिती पोर्टलवर नोंदवली नसल्याचे समोर आले.

याआधी झाली होती मृत्यू नोंदीबाबत टीका

>> विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद केली नसल्याची टीका केली होती. मुंबई महापालिका तसेच सोलापूरतील रुग्णालयात हे उघडकीस आले होते.

>> उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची नोंद न झाल्याने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र, नोंद न झालेल्या एक लाख आठ हजार बरे झालेल्या रुग्णांची नोंद केली असता उपचार झालेल्या रुग्णांचा टक्का वाढेल.