फडणवीस सत्तेकडे ‘आशाळभूत’पणे पाहत आहेत, महसूलमंत्री थोरात यांची बोचरी टीका

पोलीसनामा ऑनलाईन : आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे देवेंद्र फडणवीस आहेत. ते तसे म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात असल्याचे चित्र आम्हाला दिसत आहेत, अशी बोचरी टीका महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महसूलमंत्री थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली. त्यावरुन त्यांना विचारले असता त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले अशी भावना व्यक्त केली. मात्र याबाबत बोलत असतानाच त्यांनी फडणवीस यांच्यावरही टीका केली. आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात असल्याचे चित्र आम्हाला दिसत असल्याचे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली होती. कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचे सरकार पाच वर्षे चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे असा विश्वासही व्यक्त केला आहे.

पवारांच्या त्या पत्रांचा आधी नीट अभ्यास करा
सध्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे हे अन्यायकारक आहेत. हे कायदे भांडवलदारांचा फायदा करुन देणारे आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्राचा संदर्भ दिला जातो आहे. तो संदर्भ देणाऱ्यांनी ते पत्र जरुर नीट वाचावे त्यावेळी शरद पवार यांनी ते पत्र शेतमालास योग्य किंमत मिळावी आणि जनतेला ती उत्पादन स्वस्त मिळावीत या अनुषंगाने ते पत्र लिहिले होते. आधी त्या पत्राचा नीट अभ्यास करावा, भांडवलदारांचा फायदा व्हावा यासाठी ते पत्र नव्हते. आताच्या सरकारने लादलेले कायदे हे भांडवलदारांचा फायदा करुन देणारे आहेत असेही थोरात यांनी म्हटले आहे.