राज्यातील दारूविक्रीचे आकडे वाचून तुम्ही म्हणाल ‘मंदी-बिंदी’…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र, या काळात राज्यातील आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकान सुरु केली. पण काही ठिकाणी दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन्हा मद्यविक्रीचा निणर्य मागे घेण्यात आला. त्यानंतर महसूल मिळविण्यासाठी दारूची ऑनलाइन विक्री सुरु करण्यात आली. आता याच मद्यविक्रीमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात चार मे पासून आजपर्यंत साधारणतः तीनशे कोटी रुपयांचा महसूल मद्यविक्रीच्या स्वरूपात राज्य सरकारला मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर भागात वाईन शॉप आणि होम डिलिव्हरीच्या माध्यमातून मद्यविक्री सुरु आहे. तसेच ऑनलाइन मद्यविक्री आणि सेवांचा परवाना देखील मिळतं असल्यानं अनेक जणांनी त्याची देखील ऑनलाइन नोंदणी केली आहे. राज्यात ३३ जिल्ह्यातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर जिल्हे वगळता काही जिल्ह्यांमध्ये सशर्त दारूविक्री सुरु आहे. मात्र, काही जिल्ह्यात मद्यविक्री अद्यापही बंद आहे.

ऑनलाइन मद्यविक्रीच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात येत असून, राज्यात
एका दिवसात गुरुवारी ३४ हजार ३५२ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला. मद्यसेवन परवाना एका वर्षाकरिता १०० रुपये तर जीवन परवण्याकरिता १००० रुपये एवढे शुल्क आकारले जात आहे. राज्यात एकूण दहा हजार ७९१ किरकोळ मद्यविक्री पैकी पाच हजार ८६४ सुरु आहेत. गुरुवारी एका दिवसात सुमारे ३४ हजार पेक्षा जास्त ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यात अवैध दारूविक्री प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पाच हजार ९८४ गुन्हे नोंदविण्यात आले असून, २६६४ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तर राज्यात सुमारे १६ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.