SSR Case : समोर आला रियाचा ITR तपशील, कंपनीतील शेअरपासून FD पर्यंतचा खुलासा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची सतत चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी आणि आज सोमवारी रिया, तिचा भाऊ, वडील आणि व्यवस्थापक यांची चौकशी केली. एकीकडे ईडीची रियाच्या सर्व व्यवहारावर नजर आहे. याच दरम्यान एका वृत्तसंस्थेनुसार, रिया चक्रवर्तीच्या आयकर परताव्याचा तपशील मिळाला आहे. त्यावरून बर्‍याच गोष्टी समोर आल्या आहेत.

२०१७-१८, २०१८-१९ आर्थिक वर्षाच्या आयटीआरमध्ये रिया चक्रवर्तीची कमाई अचानक वाढली, परंतु स्त्रोत माहित नव्हते. आता ईडी याच उत्पन्नाच्या स्त्रोताची तपासणी करत आहे. रियाने बर्‍याच ठिकाणी गुंतवणूक केली आहे. जे तिच्या कमाईपेक्षा जास्त दाखवत आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात रियाची कमाई जवळपास १८ लाख होती. (हे कर कपातीपेक्षा वेगळे आहे)
२०१८-१९ आर्थिक वर्षात रियाने आयटीआरमध्ये १८ लाख रुपये उत्पन्न दाखवले आहे.
२०१८ ते २०१९ दरम्यान रियाची स्थिर मालमत्ता ९६ हजारांवरून ९ लाखांवर गेली.
एवढेच नव्हे तर रिया काही कंपन्यांमध्ये भागधारक देखील आहे. ईडी त्याचीही चौकशी करत आहे की, रियाने २०१७-१८ मध्ये ३४ लाख रुपयांचे शेअर्स कोठून खरेदी केले, जेव्हा कमाई केवळ १८ लाखांची आहे.
रियाचा भागधारक निधी २०१७-१८ मध्ये ३४ लाखांवरून २०१८-१९ मध्ये ४२ लाखांवर पोहोचला.
याशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक मधील एफडीचीही चौकशी केली जात आहे.
आयटीआरमध्ये २०१७-२०१९ दरम्यान कोणत्याही मोठ्या व्यवहाराची माहिती नाही.

विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या कुटूंबाच्या वतीने सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये काढले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यतिरिक्त आणखीही अनेक पैशांच्या व्यवहाराबाबत सांगितले गेले होते. त्यानंतरच ईडीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तीव्र केली आहे.

ईडी रिया व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्य आणि व्यवस्थापकाशी बोलत आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या चौकशीत रियाने सुशांतच्या खात्यातून पैसे काढण्याबाबत नकार दिला होता. ईडीने रियाची सुमारे ८ तास आणि तिच्या भावाशी सुमारे १२ तास चौकशी केली होती.

ईडी व्यतिरिक्त आता या प्रकरणात सीबीआयची एंट्रीही झाली आहे. केंद्र सरकारने सीबीआयला याची चौकशी करण्यास मान्यता दिली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे की, हे प्रकरण अद्याप राज्य पोलिसांकडे आहे, सीबीआयकडे ट्रान्सफर केलेले नाही.