तंबाखूच्या रोपट्याच्या ॲण्टी-इन्फ्लेमेटरी प्रोटीनद्वारे संधिवाताचा इलाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तंबाखूचे सेवन आरोग्यास हानीकारक असले तरी तिच्या रोपट्यामध्ये विविध आजारांवरील उपचाराचे गुणधर्म दिसून आले आहेत.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, तंबाखूच्या रोपट्याचा अँटी-इंफ्लेमेटरी प्रोटीनच्या निर्मितीसाठी वापर केला जातो. या प्रोटीनच्या मदतीने संधिवात, टाइप-२ मधुमेह, पक्षघात आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांवर जास्त प्रभावी आणि परवडणारा उपचार शोधला जाऊ शकतो. कॅनडातील वेस्टर्न ओंटारियो युनिव्हर्सिटी आणि लॉसन हेल्त रिसर्च इ्स्टिटट्यूटच्या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात मानवी प्रोटीन इंटरल्युकिन ३७ ची (आयएल-३७) निर्मिती करण्यासाठी तंबाखूच्या रोपट्याचा वापर केला.

हे प्रोटीन नैसर्गिक रुपात मानवी किडनीमध्ये अतिशय कमी प्रमाणात तयार होते. वेस्टर्न ओंटारियो युनिव्हर्सिटीतील सहाय्यक प्राध्यापक टोनी जेवनिकर यांनी सांगितले की, हे प्रोटीन शरीरातील सूज प्रभावीपणे नियंत्रित करते. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये हे प्रोटीन इंफ्लेमेटरी आणि ऑटोइ्नम्यून आजारांवरील उपचारात प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.