रिक्षा चालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला दमदाटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यामध्ये वेड्यावाकड्या रिक्षा उभ्या करुन वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षा चालकांची मुजोरी जास्त वाढली आहे. बुधवारी कोंढवा येथील सत्यानंद हॉस्पीटलसमोर एका रिक्षा चालकाने वाहतूकीचे नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन दमदाटी केली. हा प्रकार सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

पुण्यातील प्रत्येक चौकामध्ये रिक्षा चालक आपली रिक्षा कशाही पद्धतीने लावून वाहतूकीची कोंडी करीत असतात. प्रवाशी मिळवण्यासाठी निम्मा रस्ता हे रिक्षा चालक व्यापून टाकतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. कोंढवा येथील सत्यानंद हॉस्पीटलसमोर इम्तियाज अब्दुल शेख (वय – ३५ रा. ग्रीन पार्क आयेमन अपर्टमेंट, कोंढवा) या रिक्षा चालकाने त्याची रिक्षा वाहतूकीच्या विरुद्ध बाजूस लावली होती. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

कोंढवा पोलीस वाहतुक विभागाचे पोलीस नाईक विलास किरवे हे वाहतूकीचे कर्तव्य बजावत होते. किरवे यांनी रिक्षा चालक शेख याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितली. त्यावेळी शेख याने किरवे यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. किरवे यांनी याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे. कोंढवा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

पुणे शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा चालक प्रवाशी मिळवण्यासाठी टप्प्या टप्प्याने उभे राहतात. त्यामुळे वाहतुक कोंडीमध्ये भर पडते. बेशिस्त रिक्षा चालक बस स्थानक, रेल्वे स्थानकाबाहेर किंवा मंडई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी आपली रिक्षा उभी करतात. याचा परिणाम वाहतूकीवर होतो. नागरिकांना बेशिस्त रिक्षा चालकांचा मनस्ताप करावा लागत आहे. बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई कधी होणार? असा सवाल पुणेकर करू लागले आहेत.