रिक्षावाल्याने रिक्षात केला विनयभंग ; मुलीने मारली चालू रिक्षातून उडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सहा आसनी रिक्षा चालकाने नृत्य प्रशिक्षक असणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. तरुणीने चालू रिक्षातून उडी मारल्याने तिने आपला प्राण यशस्वीरीत्या वाचवला आहे. या संदर्भात त्या तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. चालू रिक्षातून त्या तरुणीने उडी मारल्याने तिला किरकोळ स्वरूपात दुखापद झाली आहे.

फिर्यादीदार तरुणी रात्री स्वारगेट वरून धायरीला जात होती. या दरम्यान ती सहा आसनी रिक्षाने प्रवास करत होती. सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे भागात एक महिला आणि पूरूष रिक्षातून उतरल्याने ती तरुणी रिक्षात एकटीच राहिली. ठरल्या प्रमाणे धायरी भागात रिक्षा घेऊन जाणे अपेक्षित असताना त्या रिक्षा चालकाने रिक्षा सिंहगडाच्या दिशेने कालव्या जवळ नेहण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याने रिक्षा माघारी आणला आणि तो रिक्षा पुन्हा मुंबई-बंगळुरु बाहयवळण मार्गाच्या दिशेने नेह्ण्याचा प्रयत्न केला.

आपल्या रोजच्या दिशेने हा रिक्षा जात नाही असे युवतीच्या लक्षात येताच त्या युवतीने त्या रिक्षा चालकास रिक्षा कोठे घेऊन चालला आहेस असे विचारले. तर त्याने नऱ्हे भागात थोडे काम आहे तुम्हाला मी १० मिनिटात धायरीला सोडतो असे सांगितले. गोल्ड जिम जवळ तरुणीने त्या रिक्षावाल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्या रिक्षा चालकाने त्यामुलीच्या तोंडावरचा स्कार्प ओढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान राखत चालू रिक्षातून उडी मारली. त्या नंतर तिने आपल्या मित्राला फोन लावून झालेल्या प्रकारची कल्पना दिली. पोलीसात फिर्याद दिल्या नंतर आता पोलीस उपनिरीक्षक आशा गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.