महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी रिक्षा रॅली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर आयोजिक करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून पुण्यात आज पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने जनजागृती रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या 55 रिक्षांचा समावेश होता. खासदार गिरीश बापट व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे व शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर उपस्थित होते.

पुणे शहर 2020 पर्यंत देशातील सर्वांत स्वच्छ व स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांकाचे व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी अशाप्रकारच्या जनजागृती रॅली उपयुक्त ठरतात. आजची रॅली स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि शिवनेरी रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली. लाल महालापासून या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचा समारोप पुणे महापालिका भवन येथे झाला.

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या रॅलीत 55 रिक्षांचालकांचा सहभाग होता. मुलांनी पारंपारिक वेष परिधान करुन स्वच्छ भारत अभियानासंदर्भात घोषणा दिल्या. पुणे महापालिकेच्या कर्मचा-यांनी रॅलीचे स्वागत केले. या रॅलीत सहभागी झालेले रिक्षाचालक आता पुणे महापालिकेचे स्वच्छता मित्र म्हणून काम करणार आहेत, अशी माहिती सचिन निवंगुणे व अशोक साळेकर यांनी दिली. यावेळी पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व शिवनेरी रिक्षा संघटनेचे आबा बाबर, संजय डांगी, कैलास डांगी, हरिश चौधरी, शिवाजी लोकरे आणि पुणे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Visit : Policenama.com