‘वंचित’ आघाडीमध्ये फूट ? RSS चे लोक घुसल्याचा लक्ष्मण मानेंचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत फूट पडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीतील फूट समोर आली आहे. आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांची राहिली नाही, असा खळबळजनक आरोप वंचितचे महत्त्वाचे नेते लक्ष्मण माने यांनी केला आहे. माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच राजीनामा द्यावा अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या कामाची पद्धत पाहता मी त्यांच्यासोबत काम करू शकत नसल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर यांना आघाडीत स्थान दिल्याने मानेंची नाराजी
वंचितचे सांगलीतून लोकसभेसाठी उभे राहिलेले गोपीचंद पडळकर हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली. तसेच आमचे मत न घेताच त्यांनी त्यांना पक्षाचे प्रवक्ते केले, असा आरोप माने यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळेच वंचितवर भाजपची बी टीम असल्याचे आरोप होत असतात. आंबेडकर असे वागल्यामुळेच हे आरोप होत असल्याचे माने म्हणाले. मी कट्टर आंबेडकरवादी असून कधीही आरएसएस, भाजप किंवा शिवसेनेचे समर्थन करू शकणार नाही, असे म्हणत माने यांनी आंबेडकरांवर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरूनच आपण प्रवक्तेपदासाठी पडळकरांचे नाव सुचवून त्यांना अनुमोदन दिल्याचे माने म्हणाले.

मानेंचा प्रवक्तेपदाचा राजीनामा, बहुसंख्य कार्यकर्ते आमच्या बाजूने असल्याचा मानेंचा दावा
दरम्यान, आपण प्रवक्तेपदाचा राजीनामा आंबेडकर यांच्याकडे सोपवला असून आपण आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही, असा उल्लेख असलेले पत्र आंबेडकर यांना पाठवल्याचे माने म्हणाले. वंचितचे बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या बरोबर असल्याचा दावाही माने यांनी केला आहे.

लक्ष्मण माने राष्ट्रवादीचे हस्तक – पडळकर
लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हस्तक असल्याचा थेट आरोप गोपीचंद पडळकर यांनी मानेंवर केला आहे. माने यांचे म्हणणे स्वीकारण्याजोगे नसून त्यांचे दुखणे काही वेगळेच आहे असे पडळकर म्हणाले. पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी माने यांनीच आपले नाव सूचवले, तसेच अनुमोदनही त्यांनीच दिले, याकडेही पडळकर यांनी लक्ष्य वेधले.

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी