प्रवासी तरुणाला लुबडणाऱ्या रिक्षाचालकास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देउन ३४ हजारांचा ऐवज लुबाडणाऱ्या रिक्षाचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास उंड्री पिसोळी रस्त्यावर तरुणाला लुबाडण्यात आले होते.

भरत दिनकर साळवे (वय २८ रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पाबूभाई सुतार (वय २० रा. पिसोळी) या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुतार हा हडपसर कात्रज बायपास रोडवरून एका रिक्षात बसला. त्यावेळी उंड्री चौकाकडे जात असताना खडी मशीन चौकाच्या पुढे टायनी कंपनीसमोर साळवेने रिक्षा थांबविली. त्यावेळी रिक्षात चालकासोबत त्याचा साथीदारही होता. त्यांनी सुतार याला रिक्षातून खाली उतरवून हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडील रोख ३० हजार ४०० रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर त्याला लुबाडणारा रिक्षाचालक कोंढव्यातील सोमजी चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून सुतारचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, पोलीस कर्मचारी जयंत चव्हाण, सुशील धिवार, निलेश वणवे, जगदीश पाटील, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like