RIL चं नवीन ‘रेकॉर्ड’ ! जगातील 50 मोठ्या कंपन्यांमध्ये समावेश, किती झाला ‘एम-कॅप’ जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) जगातील 50 सर्वोच्च बाजार भांडवल कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. आरआयएलने 13 लाख कोटी एम-कॅप पातळी ओलांडून हे यश संपादन केले आहे. गुरुवारी कंपनीची मार्केट-कॅप 13,06,329.39 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली. रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी आहे, जिची एम-कॅप 13 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. शेअर बाजाराकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, तेलापासून ते टेलिकॉम क्षेत्रापर्यंत व्यापार करणारी आरआयएल मार्केट-कॅपच्या बाबतीत जगातील 48 व्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

सध्या सौदी अरामको ही एम-कॅपच्या बाबतीत 1.7 ट्रिलियन डॉलर्सची जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन आणि अल्फाबेट कंपनीचा क्रमांक लागतो. गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आरआयएलचा शेअर 2.82 टक्क्यांनी किंवा 56.55 रुपयांच्या वाढीसह 2060.65 वर बंद झाला आहे. कंपनीने नुकतेच राइट्स इश्यूद्वारे जारी केलेले अर्धवट भागधारक शेअर्स देखील व्यापार करत आहेत. अशा प्रकारे कंपनीकडे संयुक्त एम-कॅप 13.5 लाख कोटी रुपये झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एम-कॅपबरोबरच या समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये देखील निरंतर वाढ होत आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील आघाडीचे गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे यांच्या तुलनेत अंबानींची संपत्ती अधिक आहे. फोर्ब्सच्या बिलेनियर्स लिस्ट (Forbs Billionaire List) नुसार, रिलायन्स अध्यक्षांची एकूण मालमत्ता 77.7 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.