ममतांच्या ४० टक्के रणरागिणी लोकसभेच्या रिंगणात 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांना ४०.५ टक्के तिकीट जाहिर केले आहे. याबाबतची घोषणा त्यांनी मंगळवारी केली. दरम्यान, ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यापूर्वी बिजु जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ३३ टक्के महिलांना तिकीट देण्याचे जाहीर केले होते. ममता बॅनर्जी यांचे महिला धोरण पुन्हा एकदा सामोर आले असून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

नुकतंच १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत निवडणूका होणार आहेत. राज्यात ४२ जागास असून इथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत असणार आहे. सात टप्प्यांत निवडणुकीवर तृणमूल काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यामध्ये मतदान होईल. मात्र या निवडणूक तारखा रमजान महिन्यात येत असल्याने तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.