‘अधिकारी ऐकत नसतील तर दंगा करा’ !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तुमची कामे होत नसतील तर दंगा घाला, बिल्कुल दंगा करा, भीक मागितली तर कोणी देत नाही. आपला अधिकार आहे, हिसकावून घ्या. आम्ही येऊन तालुका सांभाळायचा तर तुम्ही काय सांभाळायचे, असे वादग्रस्त वक्तव्य कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अधिकारी कामे करत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या वक्तव्याची री ओढत सोबत 4-5 पोरं घेऊन जा असे म्हटले आहे. मंत्र्यांच्या या अजब सल्ल्याने सर्वच चक्रावले आहेत. मात्र, यानंतर त्यांनी सारवासारव केली.

सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनामध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात सोलापूरात आले होते. या दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकही घेण्यात आली. यावेळी यशोमती ठाकूर बोलत होत्या. कोणत्याही तालुकाध्यक्षाने तक्रार करु नये. तुम्ही तुमचा तालुका सांभाळायला पाहिजे. तुम्ही सांभाळा, तुम्हाला ताकद देण्याचे काम आम्ही करु, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले.

यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांवर आपलाही धाक असायला हवा. जनतेचा प्रशासनावर धाक हवा. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीनं गेलं पाहिजे. दोन-चार पोरं या बाजूला, दोन-चार पोरं दुसऱ्या बाजूला घेऊन गेलं की सगळं व्यवस्थित चालतं, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी बैठीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना दिला.

मात्र, नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या वक्तव्यावरुन सारवासारव केली. काम करण्यासाठी पैसे घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नैतिक धाक असायला हवा, अशा अर्थाने आपण वक्तव्य केल्याचे स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिले. दरम्यान, ग्रामीण भागात मृत्यूदर वाढू देवू नका, अशा सूचना बाळासाहेब थोरात यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.