पुरंदर विमानतळ : इंचभरही जमीन देणार नाही; रिसे, पिसे, पांडेश्वर परिसरातील शेतकरी आक्रमक

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईन – विमानतळ ऑफ इंडियाने रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर परिसरात विमानतळासाठी तत्वतः मान्यता दिल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आम्हाला विमानतळापेक्षा आमच्या जमिनी महत्त्वाच्या आहेत, विमानतळासाठी येथील इंचभर देखील जमीन देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतक-यांनी घेतली आहे. याकरिता या सर्व गावातील शेतकऱ्यांनी आज राजुरी येथे सर्व शेतकरी व ग्रामस्थांची बैठक बोलावली आहे. बैठकीत विमानतळास कशा पद्धतीने विरोध करायचा याबाबतची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

पुरंदर तालुक्यातील पारगाव परिसरातील 7 गावांमध्ये यापुर्वी विमानतळासाठी जागा निश्चित करून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या होत्या. मात्र येथील शेतकऱ्यांनी विमानतळासाठी जमिनी देण्यास विरोध दर्शविल्याने व त्यांच्या आग्रहानुसार आमदार संजय जगताप यांनी देखील येथील जागा बदलण्यासाठी विधानसभा निवडणुकी अगोदर दिलेल्या आश्वासनानुसार पर्यायी जागा म्हणून रिसे पिसे, पांडेश्वर येथील नव्याने जागा मध्यंतरी झालेल्या पुण्यातील बैठकीत सुचवली होती.

या चार गावातील जागेची शासकीय स्तरावर पाहणी झाल्यानंतर सध्या विमानतळ ऑथोरिटी ऑफ इंडियाने या जागेत विमानतळ करणे शक्य असल्याबाबतची तत्वतः मान्यता दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामुळे या चारही गावातील शेतकरी आक्रमक झालेत. कुठल्याही परिस्थितीत शासनाला विमानतळासाठी आम्ही येथील इंचभरही जमीन देणार नाही व येथे विमानतळ होऊ देणार नाही अशी भूमिका शेतक-यांनी घेतली आहे. दरम्यान पारगाव परिसरातील गावांचा विरोध होत असल्याने त्या गावांना वाचवण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका असा भावनिक सुर देखील या भागातील शेतकरी घालत आहेत.