सचिन-सेहवागप्रमाणे पंतही प्रभावी खेळाडू : सुरेश रैना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – विश्वचषक स्पर्धेत 2019 मध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीला संघातून विश्रांती दिली. यापुढील सामन्यांमध्ये ऋषभ पंत हा भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असे निवड समितीने स्पष्ट केले. दुर्दैवाने मिळालेल्या संधीचं पंतला सोने करता आले नाही. मध्यंतरी भारतीय चाहत्यांकडून पंतला विश्रांती देत धोनीला संधी देण्याची मागणी केली होती. मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने पंतला आपला पाठींबा दर्शवला आहे.

माझ्यासाठी ऋषभ पंत एक चांगला खेळाडू असून तो फलंदाजी करताना पाहणे मला आवडते. त्याच्या फलंदाजीची शैली ही सचिन, सेहवाग, युवराज, द्रविड यांच्यासारखी प्रभावी आहे. सुरेश रैना, युजवेंद्र चहलशी इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये बोलत होता. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. लॉकडाउन काळात भारतीय खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातूम एकमेकांशी संपर्कात आहेत. 2017 साली ऋषभ पंतने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते.

यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही. काही सामन्यांमध्ये ऋषभने बहारदार फलंदाजी केली असली तरीही काही सामन्यांमध्ये त्याच्या चुकांमुळे भारताला सामना गमवावा लागला आहे. नवीन वर्षात न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ विश्रांती देत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिली होती.