अखेर आजारपणाबद्दल स्वतः बोलले ऋषी कपूर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही महिन्यांपासून अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजारपणाबद्दल उलटसुलट चर्चा सुरु होत्या एवढेच काय नितु सिंग यांनी केलेल्या एका ट्विट मुळे तर या चर्चांना उधाणच आले होते. मात्र आता पहिल्यांदाच स्वतः ऋषी कपूर यांनी आपल्या आजारपणाबद्दल खुलासा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर प्रथमचं आपल्या आजाराबद्दल बोलले.

नेमकं काय म्हणाले ऋषी कपूर
माझ्या तब्येतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा आहे. मी आणखी काही दिवस कामावर परतू शकणार नाही. उपचार अद्यापही सुरु आहेत. या आजारापणातून लवकरचं बाहेर येईल, अशी आशा करतो. परमेश्वराची कृपा राहिली तर लवकरच कामावरही परतेल, असे ऋषी कपूर म्हणाले. माझा उपचार प्रचंड थकवणारा आणि दीर्घकाळ चालणारा आहेत. यासाठी संयम लागतो आणि दुदैवाने माझ्या स्वभावात तोच नाही, असेही ते म्हणाले.

मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण अलीकडे नीतू यांच्याच एका पोस्टनंतर पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. न्यु ईअर सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोला त्यांनी दिलेले कॅप्शन बरेच ‘सूचक’ होते.

‘नवीन वर्षांचा काहीच संकल्प नाही. केवळ प्रदूषण कमी होऊ देत. आशा आहे की, भविष्यात ‘कॅन्सर’ हे फक्त एका राशीचेचं नाव असेल. गरिबी कमी होऊ आणि भरपूर प्रेम व सुदृढ आरोग्य लाभू दे…’, असे नीतू सिंग यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते. नीतू सिंग यांची ही पोस्ट वाचून ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही ना ? असा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांना पडला होता.