‘उरी’ चित्रपट पाहून ऋषी कपूर म्हणाले…

मुंबई : वृत्तसंस्था – विकी कौशल याचा” उरी-द सर्जिकल स्ट्राइक’ ने अवघ्या १० दिवसात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. यावरून असेच दिसते की हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. प्रेक्षकांप्रमाणे बॉलिवूड कलाकारांनाही चित्रपट पसंत पडत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे सतत चर्चेत असणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी हा चित्रपट पाहून एक ट्विट केले आहे.

ऋषी कपूर हे सध्या आजारी असून आजारावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्क मध्ये आहे. या दरम्यान त्यांनी ‘उरी-द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपट पाहिला आणि लगेच त्यांनी या चित्रपटावर प्रतिक्रियाही दिल्या हा चित्रपट आणखी कमाई करेल असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच ‘उरी’ ही भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची उत्तम कथा आहे. आत्तापर्यंत भारतात बनलेला हा बहुधा हा सर्वात चांगला युद्धपट आहे. हा चित्रपट केवळ पाकिस्तानच्या विरोधात नसून भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी ज्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्या प्रत्येक दहशतवाद्याच्या विरोधात आहे. हा चित्रपट सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा ठरेल,’ अशी आशाही ऋषी कपूर यांनी व्यक्त केली आहे.

केवळ १० दिवसांमध्ये १०० कोटी कमाविणारा हा चित्रपट येत्या आठवड्याभरात १५० कोटींचा आकडादेखील पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टिमने १०० कोटी आकडा पार केल्याने सेलिब्रेशन केले होते.