‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्तिंचे जावई ऋषी सुनाक बनले इंग्लंडचे अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक (वय-39) यांची आज (गुरुवार) ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. सध्या ते ट्रेजरी मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. ब्रेग्झिटच्या काही आठवड्यानंतर साजित जावीद यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऋषी सुनाक यांची या पदावर वर्णी लागली.

पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पापूर्वी कॅबिनेटमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यापैकी सुनाक यांची चान्सेलर ऑफ एक्सचेकर पदावर नियुक्ती करण्यात आली. ऋषी सुनाक यांनी 2015 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. यामध्ये ते विजयी होऊन खासदार बनले होते. त्यानंतर 2018 मध्ये स्थानिक सरकारच्या मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. 2019 मध्ये त्यांना ट्रेझरीचे चीफ सेक्रेटरी बनवण्यात आले.

ऋषी सुनाक यांचे काॅंझर्व्हेटिव्ह पार्टीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पार्टीकडून मीडियाशी संवाद साधण्याचे काम तेच करतात. तसेच पंतप्रधान बोरीस जॉनसन यांच्या निवडणूक प्रचारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेकवेळा प्रसारमाध्यमांच्या चर्चेमध्ये पंतप्रधान जॉनसन यांच्या ऐवजी सुनाक यांनी सहभाग घेतला. सुनाक यांच्या पत्नीचे नाव अक्षता असून त्या नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.