वाढीव वीज बिलाचा ग्राहकांना पुन्हा ‘शॉक’ ! 300 पेक्षा अधिक युनिट वापरणाऱ्यांना फटका, 1 एप्रिलपासून दरवाढ लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. ऐन उन्हाळ्यात संचारबंदीमुळे कुटुंब घरात कैद झाल्याने विजेच्या उपकरणांचा वापर वाढला असतानाच आता 1 एप्रिलपासून निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ झाली आहे. महावितरणकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. वीज नियामक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे आता 1 एप्रिलनंतर येणारी वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना शॉक देणार आहेत. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याने ग्राहकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. .

कोणाला दिलासा कोणाला झळ, जाणून घ्या
500 युनिटच्या पुढे वीज वापर असलेल्या ग्राहकांचा स्थिर आकार दर 100 वरून 102 रुपये केला आहे. तर 1 ते 100 युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट 3 रुपये 44 पैसे मोजावे लागतील. जुना दर 3 रुपये 46 पैसे आहे. म्हणजे या वर्गवारीतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 101 ते 300 युनिटमधील ग्राहकांना 7 रुपये 34 पैसे मोजावे लागणार. जुना दर 7 रुपये 43 पैसे आहे. म्हणजे यांनाही झळ बसणार नाही.

301 ते 500 युनिटमधील ग्राहकांना 10 रुपये 36 पैसे मोजावे लागतील. जुना दर 10 रुपये 32 पैसे आहे. येथे मात्र ग्राहकांना वाढीव बिल भरावे लागणार आहे. 500 आणि त्या पुढील युनिटच्या ग्राहकांना 11 रुपये 82 पैसे मोजावे लागतील. जुना दर 11 रुपये 71 पैसे आहे. तर दुसरीकडे 0 ते 300 युनिटमध्ये 2 पैसे कमी झाले आहेत. गरीब माणूस किंवा मध्यमवर्गीयांना दिलासा आहे. ज्यांचा विजेचा वापर जास्त आहे किंवा एसीसारखी मोठी उपकरणे वापरली जातात, ज्यांचा वीज वापर 300 ते 500 युनिट आहे. त्यात 4 पैसे वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना याचा कोणताही फटका बसणार नाही. ज्यांचा वीजेचा वापर अधिक आहे, अशा ग्राहकांना याची झळ बसणार आहे.