दहशतवादी हल्ल्याची अफवा पसरवणाऱ्या निवृत्त सैनिकाला अटक

बेंगळूरु : वृत्तसंस्था – कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना दिली होती. मात्र ही अफवाच असल्याचे समोर आले आहे. चौकशीअंती हा खोडसळपणा ट्रक ड्रायव्हर असलेल्या एका निवृत्त सैनिकाने दारुच्या नशेत केल्याचे समोर आले आहे. या निवृत्त सैनिकाचे नाव सुरेंद्र मूर्ती असीन (वय-६५) असून पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता कर्नाटक पोलिसांना एका व्यक्तीने फोनवरुन सांगितले होते की, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. यावेळी दहशतवादी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडवून आणू शकतात असेही त्याने म्हटले होते. तामिळनाडूच्या रानाथपुरम येथे १९ दहशतवादी असल्याचाही त्याने दावा केला होता. फोन करणाऱ्या या व्यक्तीने स्वामी सुंदर मुर्ती नाव सांगून एक ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले होते. या माहितीनंतर कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुच्चेरी, गोवा या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अ‍लर्ट राहण्यास सांगितले होते.

या घटनेबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तपासावेळी हा ट्रकचालक निवृत्त सैनिक असल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती बेंगळुरू ग्रामीणचे पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.