महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे पाठोपाठ आसामच्या रिताचेही ‘पुरुष’ होण्याचे स्वप्न होणार पूर्ण !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांनी लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतली. आता त्या ‘ललित साळवे’ झाल्या आहेत. त्यांना यासाठी पोलीस दलानेही परवानगी दिली होती. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्यावर हे उपचार करण्यात आले. या घटनेची मोठी चर्चा सर्वत्र झाली. आता अशा अनेक घुसमटलेल्या ललिता पुढे येत आहेत. आता आसाममधील रिताही पुरुष बनण्यासाठी मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल झाली आहे. लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेसाठी रिताला आसाम सरकारने परवानगी दिली आहे.

रिताला लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेसाठी आसाम सरकारने परवानगी दिल्यानं आता शस्त्रक्रियेसाठी मुंबईत सेंट जॉर्ज रूग्णालयात आलो आहोत. सध्या डॉक्टरांद्वारे विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांच्या अहवालानंतर तिच्या लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेची तारीख निश्चित होणार आहे. तत्पूर्वी रिताचे समुपदेशनही केले जाणार आहे, अशी माहिती रिताची रिताची बहिण उर्मिला देवी यांनी दिली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर रिता यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. रजत कपूर शस्त्रक्रिया करणार आहेत.

गेल्या वर्षी रिता देवी या आसामहून रुग्णालयात आल्या होत्या. मात्र शस्त्रक्रियेसाठी आसाम सरकारची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळाली असल्याने लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रितादेवी यांची आधी सोनोग्राफी, रक्तचाचणी, एक्स-रे, ईसीजी आणि मानसिक तपासणी करण्यात आली होती. आता हार्मोन आणि अन्य आवश्यक तपासण्या सुरू आहेत. त्यानंतरच शस्त्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली. दरम्यान, सेंट जॉर्ज रुग्णालयातील ललितच्या प्रकरणानंतर अनेक जण लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात विचारणा करत आहेत. यासाठी १३ ते १४ जणांनी फोन केले आहेत. त्यात आसामच्या रिता देवी यांचाही समावेश होता.