RJ मलिष्काचा ‘BMC’वर भरवसा नाय ! पुन्हा एकदा खड्यांवरचं गाणं ‘रिलीज’ (व्हिडीओ)

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’, असे म्हणत मुंबईकरांच्या समस्या मांडणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  देखो चाँद आया जमीन पर असे म्हणत तिने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची खिल्ली उडवत रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

पावसाच्या दिवसांमध्ये दरवर्षी रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचणारे पाणी अशा अनेक  समस्या निर्माण होतात आणि या साऱ्याचा त्रास सहन करावा लागतो तो म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना. याच पार्श्वभूमीवर  आरजे मलिष्काने पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या माध्यमातून मुंबईच्या खड्ड्यांकडे सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. चांद जमीन पर असं या गाण्याला मलिष्कानं नाव दिलं आहे.

वेगळ्या पद्धतीनं गाणं सादर करून मलिष्काने मुंबईच्या रस्त्यांची समस्या मांडली आहे. या गाण्यात मलिष्कानं बॉलिवूडमधल्या गाण्यांचा वापर केला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्ये म्हणजे मलिष्कानं हे गाणं चक्क रस्त्यावरील खड्ड्यांजवळ  शूट केलं आहे.  नववधूप्रमाणे नटलेली मलिष्का लाल रंगाच्या साडीत खड्ड्याच्या आजूबाजूला बॉलिवूडमधल्या गाण्यांवर हावभाव करताना दिसत आहे. भारत देश चांद्रयानाच्या माध्यमातून चंद्रावर पोहोचला तरी मुंबईतल्या खड्ड्यांची समस्या तशीच आहे असं मांडण्याचा मलिष्कानं प्रयत्न केला आहे.

मलिष्कानं 2.40 मिनिटांचं हे गाणं फेसबूक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलं असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र मलिष्काचं हे नवीन गाणं आता महानगरपालिकेपर्यंत पोहोचतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Visit – policenama.com