ईव्हीमच्या रक्षणासाठी शस्त्रांचा वापर करा ; माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितले कि, ईव्हिमचे रक्षण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करण्याची गरज लागली तरी शस्त्रांचा वापर करा. अनेक ठिकाणांहून ईव्हीएम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत.

कुशवाह म्हणाले, बातमी आली आहे कि, ईव्हिम असलेली गाडी पकडली आहे. जो अधिकारी त्या गाडीवर होता त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. यांसारख्या घटना घडत असतील तर लोकांमध्ये शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे, यांमुळे जनतेमध्ये संताप निर्माण होत आहे. अशा घटनेची जबाबदारी भारत सरकारची आहे. ईव्हिम संबंधी अशा घटना घडत असतील तर महाआघाडीचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. ईव्हीएम पळवून नेत असल्याच्या घटना घडत असतील तर अशा घटना रोखण्यासाठी शस्त्र हातात घेण्याची गरज जरी लागली तरी शस्त्र हातात घेतले पाहिजेत.

दरम्यान, विरोधी पक्षाचे नेते सातत्याने ईव्हिमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले कि, ईव्हिमवर विरोधी पक्ष उपस्थित करत असलेले प्रश्न खोटे आहेत. ईव्हीममुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे. ईव्हिमसंबंधी उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यावर निवडणूक आयोगाने वेळोवेळी उत्तरे दिली आहेत. निवडणुकीत पराभव होत असल्यामुळे विरोधी पक्ष अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करत आहेत. हि काय नवीन गोष्ट नाही.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यानंतर ईवीएमला स्ट्रॉन्ग रूममध्ये ठेवले जाते. अशा वेळी विरोधी पक्षाचे नेते स्ट्रॉन्ग रूमच्या सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या काही दिवसापासून अनेक नेत्यांनी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या एव्हिम मध्ये छेडछाड केली जात असल्याची तक्रार केली आहे.