स्कॉर्पिओ-दुचाकी अपघातात तीन जण जागीच ठार

सेलू : पोलीसनामा ऑनलाईन- सेलूपासून जवळच असलेल्या कवडधन पाटीजवळ शनिवारी (दि.२९) मध्यरात्री दीड वाजता स्कॉर्पिओ व दुचाकीची जोरदार धडक बसल्याने या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्यास पुढील उपचारार्थ येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील चार तरुण दुचाकीवरून सेलू येथे सुरू असलेल्या श्री. केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेसाठी गेले होते. यात्रा पाहून उशिरा ढेंगळी पिंपळगावकडे जात असताना सेलू-परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ परभणीहून येणार्‍या स्कॉर्पिओ (एमएच २२ यु ८२२२) व दुचाकीची (एमएच २० एपी ४७९९) समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीवरील चार पैकी तीन जण जागीच ठार झाले. अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सिद्धार्थ शेषेराव मगर (वय २८), अविनाश महादेव मकासरे (३०), सिद्धार्थ आसाराम दवंडे (३०) या तिघांचा समावेश आहे. तर कुलदीप आसाराम पंडागळे (३०) हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीतील बलून उघडल्याने आतमधील नागरिकांना फारशी इजा झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस नाईक आप्पासाहेब वराडे, आनंता थोरवट, लक्ष्मण चव्हाण, संतोष पैठणे, शेलार यांनी घटनास्थळी धाव घेवून रूग्णवाहिकेला पाचारण केले. अपघातात मरण पावलेले तिघेही ढेंगळी पिंपळगाव येथील असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like