Coronavirus : चिंताजनक ! जिल्हाबंदीसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे उपचाराअभावी ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करत आहेत. दरम्यान काही ठिकाणी जिल्हाबंदी किंवा गावबंदीसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. अशीच एक घटना करमाळा तालुक्यात घडली आहे. बाहेरगावचे नागरिक गावात येउ न देण्यासाठी चक्क रास्तच खोदून ठेवल्याने उपचाराअभावी एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची सीमा असलेल्या कोंढारचिंचोली येथील पुलाच्या पलीकडे चक्क जेसीबीच्या साहाय्याने रस्ताच उकरून टाकण्यात आला आहे. करमाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या कोंढार चिंचोलीचा पूल ओलांडताच थेट पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे जाता येते.

कोंढारचिंचोली येथील शिवाजी डफळे या वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी जवळ असलेल्या भिगवणला घेऊन जायचे होते. मात्र येथील रस्ताच पूर्णपणे उकरून खड्डा केल्याने गाडी पुलावर नेताच येत नव्हती. अशावेळी पुणे जिल्ह्याच्या भागातून दुसरी गाडी मागवून त्यांना उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र यात वेळ गेल्याने डोळ्यादेखत तडफडत डफळे यांनी प्राण सोडले. कोरोनासाठी जिल्हाबंदी करायचीच होती तर रस्ता बंद करायचा मात्र थेट रस्त्यावर भला मोठा खड्डा केल्याने उपचाराअभावी रुग्णाला जीव गमवावा लागला, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. आता जिल्हाबंदीसाठी बेकायदेशीररीत्या असा खड्डा खोदायच्या अघोरी उपाय करणार्‍यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आता तरी रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत