हडपसरमधील रस्त्यावर अतिक्रमणचा विळखा घट्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये शिथिलता आणली असून, आज (सोमवारपासून) हॉटेल्ससुद्धा सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शिथिलता आणल्यापासून हडपसरमधील रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत आहे. अतिक्रमणचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. मात्र, हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेला अतिक्रमण विभाग मूग गिळून गप्प बसला आहे. हडपसर-गाडीतळ ते गांधी चौक आणि मगरपट्टा चौक ते गाडीतळ दरम्यानचे पदपथ आणि सायकल ट्रॅक पुन्हा दुकानदार, फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी व्यापले आहेत. मगरपट्टा चौकात बटाटावडा-पाववाल्याने फलक चक्क रस्त्यात उभा केला आहे. या रस्त्याने महापालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी ये-जा करतात. मात्र, त्यांच्या गाडीच्या काचा बंद असल्यामुळे त्यांना अतिक्रमणे दिसत नसतील. तर कर्मचाऱ्यांचे हात ओले केले जात असल्यामुळे कारवाई होत नसावी, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख यांच्याकडे वारंवार तक्रार केल्यानंतर ते काम आमचे नाही, पोलिसांचे आहे, असे सांगून फोन ठेवून दिला जात आहे. पोलिसांकडे तक्रार केली, तर पोलीस म्हणतात ते काम पालिकेचे आहे. आता अतिक्रमण हटविण्याचे काम नागरिकांचेच आहे, असा प्रश्न पडल्याचे महेंद्र बनकर आणि मुकेश वाडकर यांनी सांगितले.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन केल्यानंतर हडपसरमधील रस्ते, चौक मोकळे झाले होते. अतिक्रमणे नाहीशी झाली होती. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग सुस्त पहुडला होता. मात्र, आता रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि पादचाऱ्यांसाठीचे पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याचे काम करणे अपेक्षित आहे. मात्र, अतिक्रमण विभाग गल्लीबोळातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात मग्न असल्यामुळे त्यांना मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे दिसत नाही की, आर्थिक हितसंबंधामुळे कारवाई केली जात नाही, असा सवालही वाडकर यांनी उपस्थित केला आहे.