राज्यातील लाखो कुटुंबांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री ठाकरे मोठया निर्णयाच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वाहतूक क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून अनेक वाहनधारक आर्थिक संकटात आहेत. त्याच अनुषंगाने राज्यातील वाहतूक क्षेत्राला वित्तीय साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळासाठी राज्यातील ११.४ लाख वाहतूक व्यावसायिकांना ७०० कोटी रुपयांची रस्ते कर माफी देण्यात येणार असल्याचं माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

शासनाच्या आकडेवारीनुसार, राज्यात ११.४ लाख नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आहेत. त्यात पर्यटक, टॅक्सी, बस, स्कुल बस, मिनी बस, ट्र्क, टँकर आणि मालवाहू वाहने यांचा समावेश आहे. टाळेबंदी केल्यापासून या सर्वांचा व्यवसाय ठप्प आहे. त्याबाबत वाहन मालक आणि त्यांच्या संघटनांकडून राज्य शासनाला सातत्याने मागणी करण्यात आली होती. म्हणूनच या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी कर माफी करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हालचाली सुरु केल्या होत्या. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि हरियाणा सोबत १२ पेक्षा अधिक राज्यांनी सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली आहे.

महाराष्ट्रात वाहनाचे दोन गट आहेत. वर्षाला रस्ते कर देणाऱ्या वाहनांची संख्या ११.४ लाख एवढी आहे. यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांसाठी व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली जाणार असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं.वाहतूक विभागाकडून राज्य शासनास सध्या कोणताही कर मिळत नाही. त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलची विक्री कमी झाल्याने शासनाच्या महसुलात घट झाली आहे. तसेच विमा क्षेत्रही संकटात सापडलं आहे. अनेक वाहन मालकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन वाहने घेतलेली. आता त्यांना कर्ज परतफेड करण्यास अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रावरील कर्ज ५.४ लाख कोटींवर पोहचले असताना मुख्यमंत्री हा धाडसी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं.