चिनी सैन्याकडून ‘देप्सांग’कडे जाणारा मार्गच बंद !

पोलिसनामा ऑनलाईन – भारत-चीनमध्ये धुमश्चक्रीआधी पँगाँग सरोवराच्या उत्तरेला देप्सांग येथील भारताच्या पाच पारंपरिक गस्ती ठिकाणांकडे जाण्याचा मार्ग चिनी सैन्याने बंद केला होता. भारतीय जवानांना गस्त घालण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले होते, परंतु उत्तर लडाखमधील वस्तुस्थिती वेगळी आहे.गस्ती ठिकाणी जाण्याचा मार्ग चीनने या वर्षी मार्च- एप्रिलमध्ये बंद केला असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले आहे .

सामरिकदृष्टया महत्त्वाच्या दार्बुक- श्योक- दौलत बेग ओल्डी मार्गाच्या उत्तरेला असलेली पाच गस्ती ठिकाणे प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) जवळ आहेत, मात्र प्रत्यक्षात या रेषेवर नाहीत. ही ठिकाणे भारतीय हद्द निश्चित करणार्‍या रेषेच्या आतच आहेत. भारतीय फौजांना जेथे जाऊ दिले जात नाही तो भाग नेमका किती, याबाबत सूत्रांनी सांगितले नसले तरी 50 चौरस किलोमीटर असल्याचा अंदाज व्यक्त केला. या भागाच्या सामरिक महत्त्वामुळे हा ‘महत्त्वाचा बदल’ आहे, असे या गस्ती ठिकाणांचे स्थान निश्चित करणार्‍या ‘चायना स्टडी ग्रूप’ या सरकारच्या मुख्य सल्लागार संस्थेच्या एका माजी सदस्याने सांगितले.