‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’, शिवसेनेचा भाजपावर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राजकीय वातावरण तंग असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)  यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहे. ईडीची चौकशी आणि भाजपा नेत्यांनी घटनेची करून दिलेली आठवण यावरून शिवसेनेने मुखपत्र असलेल्या आजच्या सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचे अध:पतन सध्या जोरात सुरू आहे. हवाबाण थेरेपीचा अतिरेक झाला की डोक्यात सडकी हवा जाते. त्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत. त्यांचे नाव भाजपा. भाजपाच्या नव्या घटना समितीचा विजय असो. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

भाजपाची महाराष्ट्रातून इडा-पीडा गेल्यानंतर हे ईडी प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे भाजपाविरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा वापर करून प्रयोग सुरू झाले आहेत. आता ईडीला घाबरून भाजपाच्या कळपात शिरलेल्या एका महात्म्याने ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहुर्त सांगितला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार हा मुहुर्त त्यांनी ईडीपिडीच्या पंचांगातून काढला की, त्यांना दृष्टांत झाला, हा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्तास्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे.

काय म्हंटल आहे आजच्या सामनाच्या अग्रलेखात……
ईडीची नोटिस आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. कायद्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते देखील बरोबरच आहे. कर नाही तर डर कशाला? त्यांचे हे सांगणे बरोबरच आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपाविरोधकांना का येतात हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच गंगास्नान करतात आणि बाकीचे लोक गटारस्नान करतात, असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत कर नाही तर डर नाही वगैरे ठिकच, पण करून सवरून नामानिराळे राहण्याची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उदाहरण म्हणजे बाबरी विद्ध्वंस. तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल.

चंद्रकांत पाटील हे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही काय असे विचारत आहेत. पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली आहे. त्यांनी तुम्हाला घटना मान्य नाही काय हा प्रश्न राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा. त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात हे महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे. २०२० चे ठाकरे सरकार पाडण्याचे सर्व मुहुर्त आणि प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? असा सवालही या शिवसेनेनं विचारला आहे.

मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर हेच भाजप कार्यालय असल्याचा बोर्ड काही जागरूक मंडळींनी ठोकून दिला. त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकवण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाही तर संजय राऊत, खडसे, सरनाईक असतील, नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी. त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे. कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अध:पतन सध्या जोरात सुरू आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे.

ईडीचा गैरवापर काँग्रेसच्या काळात झाला नाही काय असा सवाल विचारला जातोय. म्हणजे काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा आणि शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे. असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरेपीचा अतिरेक झाला की डोक्यात सडकी हवा जाते. त्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत. त्यांचे नाव भाजपा. भाजपाच्या नव्या घटना समितीचा विजय असो. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपाला लगावला आहे.