Kolhapur News : गुंगीचे औषध देऊन लातूरच्या 9 जणांना लुटलं, कोल्हापूर येथील यात्रीनिवासमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जेवणातून गुंगीचे औषध देऊन 9 कलाकार प्रवाशांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. गंजी गल्ली येथील एका यात्री निवासात बुधवारी (दि. 3) ही घटना घडली आहे. पोलिसांनी प्रवाशांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील एका व्यक्तीने लातूर जिल्ह्यातील राचेनेवाडी ( ता.चाकूर) येथील कुंताबाई कवरे, द्रोपदाबाई सूर्यवंशी, कुमा बाई कांबळे, सखुबाई सूर्यवंशी, लताबाई सूर्यवंशी, मशीनची चिंचोळे, राम किसन कवरे, मल्हारी सूर्यवंशी, अशोक भुरे आदी नऊ जणांना देवीचा कार्यक्रम करण्यासाठी बोलावले होते. याबाबत व्हाट्सअपवर निरोप देऊन 14 हजार रुपये कार्यक्रमासाठी देऊ असे सांगून अडीच हजार रुपयेचा ॲडव्हान्स ही दिला होता.

मंगळवारी (दि. 2) नऊ जण एसटीने कोल्हापुरात रात्री उशिरा आले. त्यांना संबंधित व्यक्तीने गंजी गल्ली येथील एका यात्री निवासात राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यानंतर त्यांना जेवण दिले. जेवणात गुंगीचे औषध घातल्याने हे नऊ जण बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे दागिने, मोबाईलवर डल्ला मारला, असे शुद्धीत आलेल्या एका प्रवाशाने सांगितले. प्रवाशांना उपचारासाठी सीपीआरमध्ये तातडीने पोलिसांनी दाखल केले आहे. नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे, हे सर्वजण शुध्दीवर आल्यानंतरच समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले.