टेम्पोची तोडफोड, धमकावून चालकाला लुटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मालवाहतूक टेम्पो अडवून कोयत्याने टेम्पोच्या काचा फोडून, चालक आणि वाहकाकडील सोळा हजार रुपये चोरुन नेल्याची घटना अजंठानगर चिंचवड येथे घडली.

या प्रकरणी जीवन भगवान साळवे (३१, रा. पिंपरी आंधळे, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) याने फिर्याद दिली आहे. तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन हा त्याच्याकडील टेम्पोत (एमएच १४, ईएम ९२३७) माल भरून सहकारी तुषार पवार यांच्या सोबत निघाला होता.

अजंठानगर येथील टीसीआय कंपनीजवळ आले असता अज्ञात आरोपीने दुचाकी टेम्पोला आडवी लावली. त्यामुळे साळवे यांनी टेम्पो थांबवला. आरोपीने टेम्पोची समोरची काच, हेडलाईट कोयत्याने फोडून टेम्पोचे नुकसान केले. साळवे यांचे सहकारी तुषार यांच्याकडील रोख रक्कम सोळा हजार रुपये कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेली. तपास निगडी पोलीस करीत आहेत.

You might also like