मंदिरांतील दानपेट्यांवर डल्ला मारणारे जेरबंद

पिंपरी पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरातील मंदिरांतील दानपेट्य़ांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईतांना पिपंरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४१ हजार ९३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहरातील ४ मंदिरात त्यांनी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

विशाल रमेश भालेराव (वय. २७), अजय रमेश भालेराव (वय. २२, दोघेही रा. भोंग्या किराण दुकानाजवळ, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वाकड, चिंचवड, पिंपरी व भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मागील काही दिवसांपूर्वी विविध मंदिरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. गुन्हे शाखेचे पोलीस याप्रकरणी तपास करत होते. भोसरीतील गवळी माथा येथील पाण्याच्या टाकीजवळच्या मैदानात दोन जण थांबले आहेत. त्यांनी बऱ्याच मंदीरातील दानपेटी, रोख रक्कमेची तसेच वस्तूंच्या चोऱ्या केल्या आहेत. अशी माहिती पोलीस उप निरिक्षक विठ्ठल बढे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून मिळाली. त्यांच्या पथकाने विशाल रमेश भालेराव आणि अजय रमेश भालेराव यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी शहरातील ४ मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातून चोरून नेलेली दानपेटी, त्यातील रोख रक्कम २० हजार ११० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याव्यतिरिक्त निगडी येथील मंदिरातील दानपेटीतून ५ हजार २२० रूपये, चिखली येथील मंदिरातून ५ हजार १०५ रूपये, पिंपरीतील मंदिरातून रोख ७ हजार रूपये आणि ४ हजार ५०० रूपये किंमतीचा पितळी नाग, उंदीर असा एकूण ४१ हजार ९३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी याप्रकरणी मंदिरातील चोरीचे ४ गुन्हे उघड केले आहेत.

सदर कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पुरूषोत्तम चाटे, पोलीस हवालदार अजय भोसले, अशोक दुधावणे, राजेंद्र शिंदे, पोलीस नाईक उमेश पुलगम, किरण काटकर, प्रदिप गोडांबे, सागर शेडगे, सुधीर डोळस, नितीन खेसे, प्रविण माने यांच्या पथकाने केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like